वाशीतील इनऑर्बिट मॉलमध्ये ‘पिंक रिटर्न फेस्टिव्हल’चा दिमाखात शुभारंभ; निसर्ग, कला आणि साहित्याचा रंगणार अनोखा संगम

  


नवी मुंबई : नवी मुंबईचे वैभव असलेल्या फ्लेमिंगो पक्षांचे (रोहित पक्षी) आगमन शहरात झाले आहे. या निमित्ताने वाशी येथील इनऑर्बिट मॉल सज्ज झाला आहे आपल्या आगळ्यावेगळ्या ‘पिंक रिटर्न फेस्टिव्हल’  साठी! जानेवारी ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात निसर्ग, छायाचित्रण, वन्यजीव संवर्धन आणि साहित्याची मेजवानी पर्यटकांना मिळणार आहे.

या महोत्सवाची सुरुवात ४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता होणाऱ्या विशेष फ्लेमिंगो फोटोवॉकने होणार आहे. प्रसिद्ध निसर्ग व वन्यजीव छायाचित्रकार डॉ. सिझर सेनगुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या फोटोवॉकमध्ये छायाचित्रणप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांना फ्लेमिंगोचे मोहक क्षण टिपण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमातून जैवविविधता संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे.

यानंतर १६ ते १८ जानेवारी या कालावधीत इनऑर्बिट मॉलमध्ये फ्लेमिंगो फोटोग्राफी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनासोबतच डॉ. सिझर सेनगुप्ता यांचे विशेष संवाद सत्र, फ्लेमिंगो थीमवरील मुलांसाठी उपक्रम, पॉप-अप स्टोअर्स तसेच आकर्षक स्ट्रिंग म्युरल आर्ट इन्स्टॉलेशन पाहायला मिळणार आहे. हे म्युरल प्रेक्षकांसाठी खास फोटो-ऑप म्हणूनही आकर्षण ठरणार आहे.

छायाचित्रण क्षेत्रातील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून, सहभागी स्पर्धकांना त्यांच्या सर्वोत्तम फ्लेमिंगो छायाचित्रांची नोंदणी करता येणार आहे. निवड झालेल्या पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक हॅम्पर्स आणि व्हाउचर्स देऊन गौरवण्यात येणार आहे.

फोटोग्राफी प्रदर्शन आणि म्युरल इन्स्टॉलेशन्स १६ ते ३१ जानेवारी या कालावधीत इनऑर्बिट मॉल, वाशी येथे पाहण्यासाठी खुली राहणार असून, महोत्सव संपल्यानंतरही रसिकांना हे दृश्य अनुभवता येणार आहे.

याच मालिकेत, वाचनप्रेमींसाठी २२ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान क्रॉसवर्ड बुक फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. विविध साहित्यप्रकारांतील पुस्तकांचा समृद्ध संग्रह या पुस्तक महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

‘पिंक रिटर्न फेस्टिव्हल’च्या माध्यमातून इनऑर्बिट मॉल, वाशी केवळ खरेदीचे केंद्र न राहता निसर्ग, कला, सर्जनशीलता आणि समुदाय सहभाग यांना एकत्र आणणारे सशक्त जीवनशैली केंद्र म्हणून आपली ओळख अधिक दृढ करत आहे.

Previous Post Next Post